एक सर्वसाधारण समज असा आहे की, वेदान्त शिकून त्याचे आचरण करण्यासाठी जंगलातील एकांतात जावे लागते. संन्यस्त, जीवन जगावे लागते; परंतु हे खरे नव्हे. कोणीही निवृत्त जीवन जगावे अशी वेदान्ताची अपेक्षा नाही. वेदान्त ही अत्यंत कृतिशील जीवनशैली आहे; निवृत्तीनंतरचे जीवन घालविण्याची योजना नव्हे. अर्थात हे जीवन आणि जीवनशैलीविषयक तत्त्वज्ञान मूलतः हिमालयाच्या घनदाट एकांतातून प्रसविले आहे, यात शंकाच नाही. शास्त्रज्ञाला त्याच्या विषयाचा पाठपुरावा करून त्यावर प्रभुत्व मिळविण्यासाठी एकांताची गरज असते, त्याप्रमाणे स्वअध्ययन, मनन आणि त्याच्या प्रत्यक्ष प्रयोगासाठी ऋषीमुनी जंगलातल्या शांत वातावरणात जात असत. परंतु हे ज्ञान आत्मसात केल्यावर वेदान्ताच्या अनुयायांनी आपल्या कार्यक्षेत्रात राहून त्यातील सिद्धान्त प्रत्यक्ष जीवनात उतरवणे हे त्यांचे कर्तव्यच होय. याशिवाय, इतिहास साक्षी आहेच की, वेदान्ताचे उपदेशक सुद्धा जगाच्या सेवेत कार्यरत होते. ते केवळ विजनवासी किंवा एकांतवासी नव्हते तर आपापल्या क्षेत्रात निस्पृह वृत्तीने काम करणारे अत्यंत उद्यमशील कार्यकर्ते होते.